Posted on 23 May, 2018 11:10 am

Likes - 0 514


नंदेश उमप आणि उदेश उमप यांच्या उपस्थितीत लोककला शिबिराची सांगता

आजकालच्या रॉक संस्कृतीमध्ये लोप पावत असलेली ‘लोककला’ जपण्यासाठी बोईसर (पालघर) येथे मनःज्योत प्रतिष्ठान तर्फे लोककला प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारी कला म्हणजे लोककला ओळखली जाते. सर्वसामान्य लोकांना ही लोककला शिकता यावी, त्यांनी ती आत्मसात करावी , तिचा आनंद घ्यावा आणि ती जोपासावी हा या शिबीराचा उद्देश आहे. 16 मे पासून सुरू असलेल्या या शिबिराचा सांगता समारंभ २७ मे रोजी होणार आहे. सायंकाळी ६ ते १० या वेळेत ठाणे जिल्हा वंजारी हितवर्धक समाज हॉल, बोईसर(प.) येथे नंदेश उमप आणि उदेश उमप यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे. 

16 मे पासून सुरू असलेल्या या लोककला शिबिराला लोककला प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यामध्ये शिबिरार्थी तमाशा, भारुड, गोंधळ, पोवाडा आदी लोककलांचे सादरीकरण करतील. शिक्षण, कला, साहित्य, संस्कृती, समाजसेवा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मन:ज्योत प्रतिष्ठान तर्फे या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कलाप्रेमी नागरिकांनी या लोककला सांगता समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन 'मन:ज्योत प्रतिष्ठान'च्या संचालिका श्रद्धा मालवणकर यांनी केले आहे.