Posted on 29 Jan, 2019 06:10 pm

Likes - 0 604


‘डोक्याला शॉट’चा धमाल टीझर प्रदर्शित

आता लवकरच ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित ‘डोक्याला शॉट’ हा भन्नाट चित्रपट घेऊन तुमच्या भेटीला येत आहे. प्रेम, मैत्री आणि लग्न याविषयावर हा चित्रपट आधारित असून या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.

अभिनेता सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी यांची चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहे. सुव्रत आणि प्राजक्ताचा लग्नसोहळा रिलीज झालेल्या टीझरमध्ये दाखविण्यात आला असून सुव्रतच्या मित्रांना मात्र या लग्नामध्ये वेगळीच चिंता भेडसावत आहे. सुव्रत हा या चित्रपटामध्ये मराठी कुटंबातला आहे. तर प्राजक्ता साऊथ इंडियन त्यामुळे लग्नानंतर या दोघांच्या आयुष्यात होणारे बदल आपला मित्र सहन करु शकेल का ही चिंता सुव्रतच्या मित्रांना सतावत आहे. त्यामुळे ते लग्नापूर्वी सुव्रतला सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच लग्नाच्या आधी आणि नंतर तरूण पिढीला वाटणारी भीती, हुरहूर, तणाव, जबाबदारी याचे दर्शन या टीझरमधून घडत आहे.

हा चित्रपट ज्यांचे लग्न होणार आहे आणि ज्यांचे लग्न झाले आहे, अशा प्रत्येक जोडप्याला स्वानुभवाची जाणीव करून देणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘डोक्याला शॉट’चा टीझरची झलक :