Posted on 07 May, 2018 11:00 am

Likes - 0 516


माधुरी दीक्षितच्या ‘बकेट लिस्ट’चा ट्रेलर प्रदर्शित

‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिचा पहिला मराठी चित्रपट असलेल्या ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवून नंतर विराम घेणारी माधुरी दीक्षित ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे.

माधुरी या चित्रपटात मधुरा साने या गृहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रत्येकाच्या मनात लपून राहिलेल्या सुप्त इच्छा-आकांक्षांची यादी म्हणजे बकेट लिस्ट. तशीच ती मधुरा या गृहिणीची आहे. या ट्रेलरमधून माधूरी ‘सई’ या तिच्या मुलीच्या बकेट लिस्टमधील इच्छा पूर्ण करताना दिसत आहे. सईचा अकाली मृत्यू होतो पण तिची बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा ध्यास तिच्या आईने घेतलेला आहे. तो कसा पूर्ण होतो हे पाहण्यासाठी 25 मेला माधुरीच्या चाहत्यांना सिनेमागृहात जावं लागणार आहे.

मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित ‘बकेट लिस्ट’ या सिनेमाची कथा दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलीवूडचा ‘चॉकलेट बॉय’ रणबीर कपूरही या चित्रपटातून मराठीजनांच्या भेटीला येणार आहे. माधुरीचा चाहता असलेल्या रणबीरने ‘बकेट लिस्ट’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली असून यात तो चक्क मराठीतून बोलतानाही दिसणार आहे.