Posted on 09 Jan, 2019 03:50 pm

Likes - 0 521


'पीएम नरेंद्र मोदी'च्या पहिल्याच पोस्टरनंतर विवेक ओबेरॉय सोशल मीडियावर ट्रोल

बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला बायोपिकचे वारे वाहत आहे. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींवर आतापर्यंत बायोपिक प्रदर्शित झाले आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आता यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पण अभिनेता विवेक ओबेरॉयवर या बायोपिकच्या पहिल्याच पोस्टरनंतर सोशल मीडियावर ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे.

विवेक ओबेरॉयच्या लूकची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. हे पोस्टर म्हणजे निव्वळ फोटोशॉप असल्याचे काही युझर्सनी म्हटले आहे. पीएमच्या भूमिकेत परेश रावल योग्य असल्याचे काहींनी म्हटले आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय हा योग्य भूमिका साकारू शकणार नाही, असेही या युझर्सनी म्हटले आहे.

या चित्रपटाचे पोस्टर तब्बल २३ भाषांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाँच केले आहे. पोस्टरमध्ये नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय हुबेहुब मोदींसारखा दिसत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन उमंग कुमार करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग करणार आहेत. जानेवारीच्या मध्यंतरी शूटींगला सुरुवात होईल. चित्रपटाची कथा मोदींच्या संघर्षावर आधारित असणार, की राजकीय परिस्थितीवर याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.