Posted on 28 Dec, 2017 02:00 pm

Likes - 0 556


सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन ५२ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाची सांगता

"समाजाच्या, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञानाची कास धरावी लागेल. आज जगभरामध्ये पुढे गेलेले देश वैज्ञानिक पायावर भक्कमपणे उभे आहेत. विज्ञानावर आधारित मोठमोठ्या संस्थांच्या जोरावरच अमेरिकेसारखा देश प्रगतशील बनला आहे. विज्ञानाच्या माध्यमातून शेतीची प्रगती, समाजाची प्रगती, औद्योगिकरण अश्या अनेक प्रश्नांवर आपण मार्ग काढू शकतो. त्यामुळे शाश्वत विकास साधण्यासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक विचार प्रबळ व्हायला हवेत, " असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. मराठी विज्ञान परिषद, वसुंधरा विज्ञान केंद्रासारख्या संस्था यासाठी अथक प्रयत्न करीत असून, आपण त्यांचे हात आणखी बळकट करूयात, असेही त्यांनी नमूद केले.

मराठी विज्ञान परिषद आणि वसुंधरा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूरपार, कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील वसुंधरा विज्ञान केंद्रात हे विज्ञान अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. समारोप सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करताना सुरेश प्रभू बोलत होते. व्यासपीठावर अधिवेशनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. उल्हास राणे, स्वागताध्यक्ष व वसुंधराचे संस्थापक सी. बी. नाईक व विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. ज्येष्ठराज जोशी, सचिव अ. पां. देशपांडे, कार्यवाह जयंत‌ जोशी, विज्ञान केंद्राचे व्यवस्थापकीय विश्वस्त अविनाश हावळ, सतीश नाईक, गजानन कांदळगावकर, ल्युपिन फाउंडेशनचे योगेश प्रभू आदी उपस्थित होते. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वसुंधराच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. तसेच अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

अ. पां. देशपांडे म्हणाले, "वैज्ञानिक दृष्टीकोनच आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो, हे या तीन दिवसांच्या अधिवेशात झालेल्या मंथनातून दिसते. जैवविविधतेवर काम करणाऱ्या विविध अभ्यासक, संशोधकांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरणे केली. निश्चितपणाने आपल्या सर्व विज्ञानप्रेमींना एक नवी दिशा या अधिवेशनातून मिळाली आहे. सी.बी. नाईक व त्यांच्या सहकार्यांनी अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. पुढील ५३ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन चाळीसगावला होण्याची शक्यता आहे."

घरडा केमिकल्स, ल्युपिन फाउंडेशन, एमकेसीएल आदी संस्थांनी या अधिवेशनाला सहकार्य केले. तृप्ती राणे व दीप्ती मोरे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश हावळ यांनी आभार मानले.