Posted on 16 Nov, 2017 07:40 pm

Likes - 0 614


पुन्हा एकदा ओम फट स्वाहा….चा अनोखा  थरार अनुभवा

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व आजही प्रेक्षकांच्या लक्षात ‘झपाटलेला’ हा चित्रपट आहे. पण आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘झपाटलेला’ चित्रपटाची थरार अनुभवायला मिळणार आहे. कारण दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी नुकतीच ‘झपाटलेला ३’ चित्रपटाची घोषणा केल्यामुळे प्रेक्षकांची तात्या विंचूला भेटण्याची उत्सुकता पुन्हा वाढणार आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात नुकतीच महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला ३’ची घोषणा केली. लोकांमध्ये अजूनही ‘झपाटलेला’ चित्रपटाची प्रचंड क्रेझ असल्यामुळेच ‘झपाटलेला ३’ हा चित्रपट करायचे मी ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. कोठारे यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटरवर तात्या विंचूचा फोटो टाकत चाहत्यांना याचे संकेत दिले होते. त्यांच्या या ट्विटमुळे चर्चेला उधाण आले होते. आता ‘झपाटलेला ३’ची अधिकृत घोषणा कोठारेंनी केली आहे.

महेश कोठारे २०१३मध्ये ‘झपाटलेला २’ घेऊन आले होते. हा मराठीतील पहिला थ्रीडी चित्रपट होता. यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी ‘झपाटलेला ३’ घेऊन यायचे ठरवले आहे. पण यात कोण-कोण काम करणार आणि चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात ठेवली आहेत.