Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 591


केतकी माटेगावकरने दिली जावेद अली यांना गाण्यात साथ !

केतकी माटेगावकर हि गोड गळ्याची गायिका आपल्याला सारेगमप मधून मिळाली, आणि ‘टाईमपास’मधून तिच्या आवाजाला चेहरा मिळाला तो स्वतःचाच. पण आता ती तिचा आवाज नव्या चेहऱ्यासाठी देणार आहे. ‘छंद प्रीतीचा’ या आगामी चित्रपटात केतकीने गाणं गायलं आहे. पण यात विशेष बाब म्हणजे हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गायक ‘जावेद अली’ यांना केतकीने साथ दिली आहे.

हिंदी चित्रपटांतील अनेक गाणी जावेद अली यांनी गाजवली आहेत. ‘गजनी’ मधील ‘गुजारिश’, ‘जोधा अकबर’ मधील ‘जश्न-ए-बहारा’ आणि ‘रांझना’ मधील ‘तुम तक’ हि गाणी तर आपल्या ओठांवर रुळली आहेत. अत्यंत भावपूर्ण आवाजाच्या जावेद यांच्यासोबत मराठमोळ्या केतकीने गीतात साथ देणं कौतुकाची बाब आहे.

प्रवीण कुमार यांनी संगीतबद्ध केलेल्या या सुरेख गीतात सुवर्णा काळे आणि हर्ष कुलकर्णी प्रीतीत मग्न होताना दिसत आहेत. पावसात, जुन्या मंदिरांत, नदी काठी रममाण होणारं हे प्रेमी युगुल पाहून आपल्यालाही पावसात भिजल्याचा आनंद मिळतो. या ‘आलं आभाळ‘ गाण्याची लोकप्रियताही वाढते आहे. कमी वेळातच हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यामुळे आता चित्रपटाची उत्सुकताही वाढली आहे. एन. रेळेकर दिग्दर्शित ‘छंद प्रीतीचा‘ हा चित्रपट १० नोव्हेंबररोजी प्रदर्शित होणार आहे.