Posted on 24 Oct, 2017 11:00 pm

Likes - 0 560


पुन्हा एका मराठी चित्रपटात दिसणार रिंकू राजगुरू

‘सैराट’ या चित्रपटातील आर्ची या भूमिकेतून आपल्या रावडी अभिनयामुळे रिंकू राजगुरूने रसिक प्रेक्षकांच्या काळजात घर केले. पण आता लवकरच एका मराठी चित्रपटातून रिंकू राजगुरू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू ‘रिंगण’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक मकरंद माने याच्या नव्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.

या चित्रपटाची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर करण्यात आली असून पण या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. पण या चित्रपटात सर्वांना भावेल असं कथानक पहायला मिळणार आहे. सोबतच श्रवणीय संगीताची पर्वणीही असेल. एकाच वेळी मकरंद आणि रिंकू या दोघांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच मकरंद आणि रिंकू दोघेही अकलूज निवासी असून राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात मकरंदचा ‘रिंगण’ हा चित्रपट गौरवला गेला आहे.

मकरंद चित्रपटाविषयी माहिती देताना म्हणाला की, सर्वांना हा चित्रपट भावेल याची मला खात्री आहे. एखाद्या कथेची आपण जेव्हा मांडणी करत असतो, तेव्हा त्यातील पात्र असू देत किंवा इतर गोष्टी या चित्र स्वरूपात पाहण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि त्यानुसार त्यासर्व बाबींचा शोध सुरू होतो. या कथेच्या नायिकेचा शोध रिंकूच्या रूपाने पूर्ण झाला. चित्रपटाची कथा ऐकून तिनेही त्वरित चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. या चित्रपटात तिने भूमिका साकारावी ही आमच्या टीमसाठी आनंदाची बाब आहे.